जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत असून बऱ्याच ठिकाणी विहिरीची पाणीपातळी खाली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देश, सूचनानुसार गिरणा प्रकल्पातून १५०० क्युसेक पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा प्रकल्प प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षापासून मान्सून काळात सरासरीपेक्षा दीड पटच अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पावर चार ते पाच तालुके तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना सिंचनासाठी अवलंबून आहेत. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल तसेच धरणगावसह अमळनेर तालुक्यातील काही ग्रामीण भागाचा यात समावेश आहे.
गिरणा प्रकल्पातून सिंचनासाठी तीन आवर्तने
जिल्ह्यात आतापर्यंत सिंचनासाठी गिरणा प्रकल्पातून तीन आवर्तने देण्यात आली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींची पाणीपातळी बऱ्यापैकी असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात आलेली नसून सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा टँकरमुक्त आहे. असे असले तरी गिरणा प्रकल्पातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी बिगरसिंचनाचे १५०० क्युसेक पाण्याचे पहिले आवर्तन रविवार १ मे रोजी दुपारी १२ वाजेनंतर सोडण्यात येणार असल्याचे गिरणा प्रकल्प अभियंता यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी ४८.२० टक्के उपयुक्त जलसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर १३०.२० टीएमसी (५१.०६ %), गिरणा २३१.०० (४४.१२%), वाघुर १९५.९३ (७८.८३%) तर मध्यम प्रकल्पात मन्याड १९.४२ टक्के, बोरी १६.७२, भोकरबारी ३१.५१, सुकी ६३.९३, अभोरा ६४.२७, अग्नावती २३.०७, तोंडापूर ४४.९८, हिवरा १३.५१, बहुळा ४१.०२, मोर ६१.२१, अंजनी ४६.८२, गुळ ५७.३३ टक्के असा एकूण ४८.२० टक्के उपयुक्त जलसाठा लघु, मध्यम प्रकल्पात आहे. तर गेल्यावर्षी या सर्वच प्रकल्पात ३९.८७ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या महितीत म्हटले आहे.
आवश्यकता असल्यास दुसरे आवर्तन जून मध्ये
जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमान बरेच आहे. त्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण भागात विहींरींची पाणीपातळी खोलवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवू नये यासाठी, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या रविवार दुपारी गिरणा प्रकल्पातून १५०० क्युसेक बिगर सिंचन पिण्याच्या पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जूनच्या सुरुवातीनंतर आवश्यकता भासल्यास किंवा पाउस लांबण्याची चिन्हे दिसत असल्यास परिस्थितीनुरूप बिगर सिंचन पिण्याच्या पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात येईल.
अभिजित राऊत, जिल्हाधिकारी