मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोणतेही वक्तव्य, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असल्यास ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई निशितच होईल, असा इशारा गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.
१ मे रोजी होणारी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा, भोंगे, हनुमान चालीसा वरून राज्यात भाजपसह मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कठोर अंमलबजावणी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहविभाग यासंदर्भात पूर्ण तयारीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली असून आज मंगळवारी पोलीस महासंचालक, आयुक्तांच्या स्तरावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलू आणि नंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, त्यानंतरच भोंग्यांबाबत आगामी एक-दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना प्रसिद्धी देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
देशात तसेच महाराष्ट्रात देखील काही घटक अशांततेचे वातावरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशांततेतेचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेतली जात असून राज्याचा पोलीस विभाग पूर्ण सतर्क आणि तयारीत आहेत. कोणताही निर्णय घेताना दोन्ही बाजूचे परिणाम पहावे लागतात, त्यानंतर राज्य सरकारची भूमिका निश्तित केली जाईल. दंगलीचा कट आहे अशी माहिती नाही. पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक होणार असून त्यानंतर आलेल्या अहवालावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, तसेच मुख्यमंत्री, सर्व गुप्तचर यंत्रणांशी चर्चा करून आणि परिस्थिती हाताळण्यासंन्दर्भात निर्णय घेतला जाईल, असे गुह्मंत्री ना.वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.