यावल (प्रतिनिधी) डॉ.नानासाहेब धर्माधिकारी संस्थानच्या सुमारे २५० सदस्यांनी आज (दि.५) सकाळी येथील पटेल कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक केला. सकाळी ६.३० ते ११.०० वाजेच्या दरम्यान राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहीमेत कब्रस्तानमधील दोन हेक्टरचा परिसर स्वच्छ करून १५ ट्रॉली कोरडा कचरा गोळा करून बाहेर टाकण्यात आला.
कब्रस्तान परिसरात वाढलेली काटेरी झुडपे, मोठमोठे गवत काढून मैदान मोकळे करण्यात आले. हिंदू स्मशानभूमी स्वच्छता मोहीमेनंतर मुस्लिम धर्मीयांच्या कब्रस्तान स्वच्छता मोहीम उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शहरातील श्री सदस्यांशिवाय, मनवेल, अट्रावल, दहिगांव येथील सदस्यांनीही या स्वच्छता मोहीमेत योगदान दिले. सदस्यांनी स्वतः घरुन विळे, कुऱ्हाडी, घमेली, फावडे, कुदळ आदी साहित्य आणले होते. कुठलाही गाजावाजा न करता श्री सदस्य आपल्या स्वच्छता मोहिमेच्या सेवेत व्यस्त होते.
मुस्लिम धर्मियांनी मात्र यावेळी कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीमेस विरोध केला.सातोद रोडवरील एक आणि चोपडा रोडवरील दोन अशा मुस्लिम धर्मियांच्या तीन कब्रस्तानात स्वच्छता मोहीम राबविण्याचे श्री सदस्यांचे नियोजन होते. मात्र ऐनवेळी मुस्लिम धर्मियांनी स्वच्छता मोहिमेस विरोध केल्यामुळे सदस्यांनी केवळ पटेल कब्रस्तान स्वच्छ करण्याची मोहीम पूर्ण केली.