नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसप्रणित युपीएची राजवट असतांना सहा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते असा दावा आज ज्येष्ठ काँग्रेसी नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा मोठा गवगवा करून मते मागितली आहेत. या पार्श्वभूमिवर, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी युपीएच्या कालखंडातही सहा सर्जिकल स्ट्राईक्स झाले होते असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या कालखंडातही या प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या असल्या तरी आम्ही याचा गवगवा केला नाही. शुक्ला म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील भट्टल सेक्टरमध्ये १९ जून २००८मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. यानंतर केलमध्ये नीलम नदीच्या खोर्यात शारदा सेक्टर येथे २०११मध्ये ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला दुसरा सर्जिकल स्ट्राइक केला गेला. ६ जानेवारी २०१३मध्ये सावन पात्र चेकपोस्ट येथे तिसरा, नजापीर येथे २७-२८ जुलै २०१३ला चौथा, ६ ऑगस्ट २०१३ ला पाचवा आणि १४ जानेवारी २०१४ला सहावा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली.