
पुणे (वृत्तसंस्था) येथील मुळशी तालुक्यातील वळणे गावात सहलीसाठी आलेले तिघे मुळशी धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. इतर दोन मुलांचा शोध सुरू आहे.


येथील मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन जण आज सकाळी धरणात बुडल्याची प्राथमिक माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. हे सर्व भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ येथे एमबीएचे शिक्षण घेणारे हे १० विद्यार्थी-विद्यार्थिनी १ मे रोजी सुट्टी असल्याने पिकनिकसाठी मुळशी धरण परिसरात गेले होते. ही मुलं त्यांच्या ग्रुपसह येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आल्या असल्याचे समजते. आज सकाळी हे सर्व धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण आणि एक तरुणी पाण्यात बुडाले.आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला असून अन्य दोन तरुणांचा शोध सुरू आहे.


