चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई केली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चाळीसगाव ग्रामीण पोलीसात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील सांगवी-तळोंदा रस्त्यालगत रात्री चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार महसूल पथकातील भामरेचे तलाठी बाबुलाल शेळके, पिलखोडचे तलाठी निलेश अहिरे आणि सायगावचे तलाठी गणेश गढी यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पो.ना. शंकर जंजाळे, संदीप माने, मनोज पाटील यांनी ७ मार्च रोजी रात्री कारवाई करत सांगवी-तळोंदा रस्त्यालगत अवैध वाळूची वाहतूक करणारे विना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली वाळू वाहतूक करतांना पकडले, यात ट्रॅक्टर चालक महादू भिकन सोनवणे (वय-२२) व ट्रॅक्टर मालक एकनाथ शंकर राठोड (वय-५३) दोन्ही रा. सांगवी ता. चाळीसगाव यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळूने भरलेले ट्रक्टर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनोज पाटील करीत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.