मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिग करणारा एकच माणूस असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. यातून या दोघांना रोकड मिळत होती तर यातील काही पैसा संयुक्त अरब अमिरातीत जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा आरोपांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रिग करतात, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावार गेला आहे. उद्धव ठाकरेंनी मे २०२० मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवले होते. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये मिळवले असेल्याचे सोमय्या झाले.
दरम्यान, याप्रसंगी सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सोनिया गांधी यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले की, महापालिका कंत्राटदारांकडून यांना रोकड्यात पैसे मिळतात. त्यांचा जो हवाला ऑपरेटर आहे त्याचं नाव उदयशंकर महावर आहे. हा जो व्यक्ती आहे तो गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. यातून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध उघड होतात. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
यशवंत जाधव यांचा हवाला ऑपरेटर उदयशंकर महावर यांनी ही माहिती दिली आहे की यशवंत जाधवचा माणून रोकडे पैसे द्यायचा. यातला काही पैसा युएईला पाठवण्यात आला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.