भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चार गावठी पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुसे घेऊन जाणार्या मध्यप्रदेशातील तरूणाला बाजारपेठ पोलीसांनी गजाआड केले आहे.
दीपसिंह गुरुमुखसिंग कलानी (वय २०, रा. तितरान्या, पोस्ट हेलापटाव, जि.खरगोन, मध्य प्रदेश) हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन भुसावळात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. त्यात रात्री १० वाजेच्या सुमारास दीपसिंग हा रेल्वे संग्रहालय परिसरात अंधारात उभा दिसला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पळ काढला. मात्र, पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
यानंतर पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. या तपासणीत त्याच्याजवळ चार गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस व रोख ८५० रुपये मिळून १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल सापडला असून याला जप्त करण्यात आले आहे. बाजारपेठ पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.