मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मॉब लिंचींगच्या माध्यमातून खून करण्याचा कट होता असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉब लिचिंगचा कट रचल्याचा गंभीर आरोप या पत्राद्वारे केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता, असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी आता केंद्राने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराविरोधात वेगवेगळे घोटाळे बाहेर काढणार्या किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरच त्यांनी सवाल उपस्थित केलेत. याप्रकरणी आता छखA चौकशी करुन हल्ल्याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
किरीट सोमय्यांना संरक्षण द्यायचं सोडून पोलिसही सरकारच्या कट कारस्थानात सामील असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलमं लावत मुद्दामूद हल्लेखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असल्याची टीका केली आहे.
पोलिसांनी किरीट सोमय्यांवर हल्ला होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच हल्लेखोरांना रोखलं का नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याप्रकरणी पोलिसही सामील असल्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्याचा कट रचणार्या महाराष्ट्र सरकारवरही कारवाई केली जावी, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलंय.