जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील निर्धार योग प्रबोधिनीच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान घेण्यात आलेल्या नेट-सेट कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
प्रबोधिनीच्या वतीने मागील काही महिन्यात लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थीहीत व सामाजिक दायित्व लक्षात घेता नेट/सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अभ्यासाचे आधुनिक तंत्र आणि कमी कालावधीत जास्त अभ्यासाचे पाठ देण्यात आले.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यात करिअरच्या दृष्टीने नेट/सेट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा ताण बघता सदर कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरली आहे. यात सामाजिक दायित्वाचा मानस ठेवून विविध विषयतज्ञांच्या माध्यमातून परीक्षेचा अभ्यास आणि नियमित मॉक टेस्टचा सराव कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. नुकतेच झालेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, कार्यशाळेतील विद्यार्थ्यांपैकी एकूण १२ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे तसेच नेट परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते.
कार्यशाळेत पेपर १ आणि २ साठी राज्यभरातील विविध विषय तज्ञांचा समावेश करण्यात आला असून कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी प्रा.हितेश ब्रिजवासी सरांच्या मार्गदर्शनात ग्रंथालयशास्त्र तर प्रा.कृणाल महाजन सरांच्या मार्गदर्शनात योगशास्त्र या विषयाच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यशाळेत काही गरजू आणि आर्थिकरीत्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. नेट/सेट परिक्षेचे महत्व आणि कार्यशाळेची आवश्यकता बघता भविष्यात देखील अशा प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे प्रबोधिनीच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच या कार्यशाळेत महत्वाचा वाटा असणाऱ्या सर्व विषय तज्ज्ञांचे निर्धार योग प्रबोधिनीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले असून या यशाचे श्रेय हे विद्यार्थी आणि विषयतज्ज्ञांनाच देण्यात आले आहे.