छिंदवाडा (वृत्तसंस्था) आपल्या भाषणात मोहम्मद अली जिनांचे नाव घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आता या प्रकरणी सारवासारव सुरू केली आहे. ‘माझी जीभ घसरल्याने मी जिनांचे नाव घेतले मला खरे तर मौलाना आझाद यांचे नाव घ्यायचे होते,’ असे सिन्हा यांनी म्हटले आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील प्रचारसभेत हे वादग्रस्त वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
सौसर या गावात झालेल्या या सभेत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘काँग्रेस परिवारात महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेलांपर्यंत, मोहम्मद अली जिनांपासून जवाहरलाल नेहरूंपर्यंत इंदिरा गांधींपासून राजीव गांधी, राहुल गांधींपर्यंत देशाच्या योगदानात मोठा वाटा आहे. देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे हे योगदान असल्यामुळेच काँग्रेसमध्ये आलो.’ ‘काँग्रेसमध्ये आलोय ते पहिले आणि शेवटचे. इथून मागे फिरणार नाही,’ असा दावाही त्यांनी यावेळी केला.