भुसावळ (प्रतिनिधी ) येथे गोपाळनगर भागातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या परिसरात गुरुवार २५ एप्रिल रोजी रात्री अनधिकृतपणे प्रवेश करून तरुणानी मोबाईलवर गाणे लावून शांततेचा भंग करत पालिका कर्मचाऱ्याना शिवीगाळ केली. तसेच एका फायरब्रिगेडच्या गाडीची काच फोडून नुकसान केल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हातील तिघांना पोलिसांनी तत्काळ पकडून न्यायालासमोर उभे केले असता पोलीस कस्टडीचे हक्क राखून ४ मे पर्यंत मॅजीस्टट कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, येथे गोपाळनगर भागातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या परिसरात गुरुवार २५ एप्रिल रोजी रात्री १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास अनधिकृतपणे प्रवेश करून तरुणानी मोबाईलवर गाणे लावून शांततेचा भंग करत पालिका कर्मचाऱ्याना शिवीगाळ केली. तसेच येथे उभे असलेली फायरब्रिगेडची गाडी( क्र. एम.एच. १९ एम ९१६८) चालू करून बिंब कार्यालयाबाहेर नेऊन त्याच्या काचा फोडल्या. यावेळी या गाडीवरील पितळी नोझल कोठेतरी पडले. काच फोडल्याने अंदाजे १५ हजार व नोझल गहाळ झाल्याने ५ हजार असे एकूण २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गोविंदा सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार शासकीय मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची भुसावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ मोहम्मद अली सैय्यद, साहिल तडवी, शंकर पाटील, पोना सुनील सैदाणे, पोकॉ विशाल मोहे, सोपान पाटील, जुबेर शेख यांनी तपास करून अनोळखी आरोपींचा शोध घेतला. यात त्यांनी गौरव सुनील बढे (वय २४, रा. खळवाडी जुना सातारा भुसावळ ), विशाल दिलीप सूर्यवंशी (वय ३२ रा. कोळीवाडा, भुसावळ ) , चेतन उर्फ गोलू दिलीप रडे (वय २६, रा. जुना सातारा, भुसावळ ) या तिघांना पोहेकॉ सैय्यद यांनी अटक केली. न्यायालासमोर उभे केले असता तिघांना पोलीस कस्टडीचे हक्क राखून ४ मे पर्यंत मॅजीस्टट कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.