अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने लोक संघर्ष मोर्चातर्फे शेकडो आदिवासी कार्डधारकाचे आमरण उपोषण करण्यात येत होते. मात्र, आज तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी स्वाक्षरी करुन लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले आहे.
तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने लोक संघर्ष मोर्चा राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व शेकडो आदिवासी कार्डधारक कुटुंब २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसणार होते.
परंतू सदर उपोषणाची बातमी प्रसारीत होताच अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी तालुक्यातील आदिवासी रेशनकार्ड Online करून अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्याची विशेष मोहिम चालू केली असून, आज दिनांक २५ जानेवारी रोजी तहसीलदार साहेबांनी लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे सह मधुकर चव्हाण, गुलाब बोरसे, नितीन पारधी, बालीक पवार, जयेश पारधी, हंसराज मोरे, अविनाश पवार, रावसाहेब पवार, महेंद्र भिल, सुदाम भिल यांच्या सोबत दिवसभरातुन दोन वेळा बैठकीत चर्चा करून सायंकाळी लोक संघर्ष मोर्चास लेखी पत्र दिले कि २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत तालुक्यातील सर्व आदिवासी कार्डधारकांना ऑनलाईन करून अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्या कुटुंबांना मार्च २०२२ पर्यंत रेशन दुकानातून धान्य मिळेल असे तहसीलदार साहेबांनी त्यांच्या स्वाक्षरीने लेखी आश्वासन दिल्याने लोक संघर्ष मोर्चा ने २६ जानेवारी २०२२ चे उपोषण स्थगित केले आहे.