जळगाव प्रतिनिधी | येथील नाशिक येथे बदली झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांना शल्यचिकित्सक कार्यालयतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांना डॉ.चव्हाण यांनी पदभार दिला.
सोमवारी दि.२४ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होते. प्रसंगी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, डॉ. एन.एस. चव्हाण यांच्यासोबतचा कार्यकाळ खूप शिकण्यासारखा होता. त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जिल्हातील रुग्णालयासाठी आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरी त्यांनी केली. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन यापुढेही कायम राहील.
प्रसंगी काही डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. एन.एस.चव्हाण यांच्याविषयी भावपूर्ण मनोगत व्यक्त केलीत. यामध्ये’ “डॉ. चव्हाण यांनी जटिल प्रश्न सोडविले. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. अनेक साधन सामग्री जिल्ह्यातील रुग्णालयांना मिळाली. त्यांची कारकीर्द गौरवशाली राहिली आहे” असे भावोद्गार काढले.
यावेळी निरोप समारंभाला उत्तर देताना डॉ.एन.एस. चव्हाण म्हणाले की, “मला आजवर २८ वर्षांची शासकीय सेवा झाली असून जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांचा प्रेमळ सहवास लाभला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी भरीव कामगिरी करता आली, याचे समाधान आहे. अधिकारी-कर्मचारी डॉक्टर्स यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करता आली. या साडेचार वर्षात जिल्ह्याच्या आरोग्य विकासात अनेक आव्हाने आलीत. मात्र संयमाने व सामंजस्याने त्याला सामोरे जाऊन ती सोडवता आली. माझे मार्गदर्शन व सहकार्य यापुढेही कायम राहील” असेही भावोउद्गार त्यांनी काढले. यावेळी विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.