जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे गुरे चारण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला दोन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, राजू शेख बाबु (वय-५४) रा. कंडारी ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार १३ जानेवारी रोजी राजू शेख बाबु यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राजू शेख बाबु हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे आणि मयुर विश्वासराव सुर्वे रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी चापटाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी राजू शेख बाबु यांच्या फिर्यादीवरून दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख गफुर शेख कादर हे करीत आहे.