यावल प्रतिनिधी । यावल शिवारातील नगरपरिषद साठवण तलावाजवळ ७ फुटी अजगराला वनविभाग आणि सर्पमित्र यांच्या मदतीने पकडून राखीव वनक्षेत्रातील जंगलात सोडून जीवदान दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल शिवारातील हडकाई नदीवरील नगरपरीषद साठवण तलावाच्या बाजूस असलेल्या डॉ. सतिश यावलकर यांच्या शेतात मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ७ फुटी अजगर शेतमजूर कमलाकर भिल यांच्या निदर्शनास आला. याबाबत तेजस यावलकर यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल यावल पश्चिम वनपरिक्षेत्रीय अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल असलम खान, सर्पमित्र जयवंत माळी, सर्पमित्र उज्वल कांनडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अजगराला यावल वनविभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्र यांच्या मदतीने शिताफीने पकडून राखीव वनक्षेत्रातील जंगलात सोडून जीवदान दिले. गेल्या दोन वर्षापुर्वी देखील डॉ सतिश यावलकर यांच्या शेतात १० फुटी अजगर पकडण्यात आला होता.