अमळनेर (ईश्वर महाजन)
दु:ख जाणीले दु:खिताचे,
पुसून टाकले मायेने
पूर लोचनातल्या अश्रूंचे !!
या उक्तीप्रमाणे ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्कारांची जोड मिळाली तरच माणसातील माणूसकीला अधिक झळाळी प्राप्त होत असते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगरूळ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पाटील व उपक्रमशील शिक्षक संजय पाटील यांना एक वयोवृद्ध नागरिक अत्यंत कडक उन्हात अंगावर कपडेही फाटलेले अशा अवस्थेत दिसला, तो बिचारा दोन दिवसांपासून उपाशीही होता. तो काहीतरी खाण्यासाठी १० रूपये मागत होता. हे दृश्य पाहून मुख्याध्यापक प्रकाश पाटील व शिक्षक संजय पाटील यांनी माणुसकीचा प्रत्यय देत त्याची असी मदत केली की, उपस्थितांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेला हा वयोवृद्ध व्यक्ती अंगावर फाटलेले कपडे व उपाशी असल्याचे पाहून मुख्याध्यापक प्रकाश पाटील, उपक्रमशील शिक्षक संजय पाटील त्यांनी त्या नागरिकाची विचारपूस केली. त्याने सांगितलेली हकीगत ऐकून या दोघांमधील माणुसकी जागी झाली. त्यांनी सदर व्यक्तीला दुकानात नेऊन नवा ड्रेस, उन्हापासून संरक्षणासाठी टोपीघेवून दिली. त्याला पोटभर खाऊ घातले त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. त्या वृद्ध व्यक्तीने समाधानाने त्यांना आशीर्वाद दिला.