नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आयसीसने आपल्या ‘अमाक’ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून श्रीलंकेतील बॉम्बस्फोट हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे.
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील चर्चमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी एकामागोमाग एक झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत तब्बल ३२१ जण मृत्युमुखी पडले होते तर ५०० हून अधिकजण जखमी झाले आहेत.
‘ईस्टर संडे’च्या दिवशी श्रीलंकेत झालेले बॉम्बस्फोट हे न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दहशतवादाची भरू लागलेली जखम पुन्हा चिघळवण्याचे कारस्थान रचणाऱ्या दहशतवादी गटांविरोधात कठोर कारवाई करण्यास लष्कराला जादा अधिकार मिळण्यासाठी श्रीलंकेचे अध्यक्ष सिरिसेना यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी जाहीर केली आहे. कोलंबोतील एका चर्चजवळील बॉम्ब निकामी करताना सोमवारी आणखी एक स्फोट झाला होता, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर ८७ डेटोनेटर्स सापडल्यानेही खळबळ उडाली होती.