रेल्वेतून पडून मृत झालेल्या वारसांना ८ लाखांची भरपाई; रेल्वे कोर्टाचा आदेश

court

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र एक्स्प्रेसने येत असताना जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रेल्वेतून पडून सुप्रीम कॉलनीतील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने मृत व्यक्तीच्या वारसांना ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नागपूर येथील रेल्वेच्या कोर्टाने दिला आहे. या निकालामुळे मृताच्या वारसांना मोठा आधार मिळाला आहे.

सुप्रीम कॉलनी येथील अरुणसिंग जहांगिरसिंग राजपूत (वय ६५) यांचा २१ फेब्रुवारी २०१६ रोजी जळगाव रेल्वेस्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा मुलगा संतोष राजपूत, मुलगी मंगलाबाई पाटील व सून सुनीता राजपूत यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अॅड.महेंद्र चौधरी यांच्यामार्फत भारत सरकार विरुद्ध न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज दाखल केल्यानंतर भरपाई न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनेसंबंधित सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश डीआरएम भुसावळ यांना दिला. यात १३ जून २०१७ रोजी ४७ पानांचा अहवाल सादर करण्यात आला. राजपूत हे रेल्वेच्या आऊट साईडने चालत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामध्ये ते खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी बापुराम शिंदे यांचाही जबाब नोंदवण्यात आला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार राजपूत हे नातवासोबत पाचोरा येथून येत होते. रेल्वे थांबण्यापूर्वी लोटालोटी व धक्काबुक्कीमुळे खाली पडले. चाकाखाली आल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा नातू नरेंद्र याचीही साक्ष न्यायालयाने नोंदवली. त्याने सर्व घटना सविस्तर सांगितली. मृत स्वत:च्या चुकीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा रेल्वे प्रशासनाचा मुद्दा खोडून काढला. सर्व साक्षी पुराव्याअंती न्यायालयाने मृताच्या तिन्ही वारसांच्या बँक खात्यात ८ लाख रुपयांची विभागणी करून देण्याचे आदेश दिले.

Add Comment

Protected Content