जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेर मतदारसंघांमध्ये आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे.
रावेर, जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुख्यतः लढत भाजपा महायुती व कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी यात होणार आहे. जळगावात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील यांच्या विरोधात महाआघाडीचे गुलाबराव देवकर आहेत. तर रावेरमध्ये महायुतीच्या खासदार रक्षाताई खडसे यांना महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांनी आव्हान दिले आहे.
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील ३६१७ मतदार केंद्रांवर मतदान सुरू झाले आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात २ दोन हजार १३ मतदान केद्र आहे. १९ लाख २५ हजार ३५२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये १० लाख ८ हजार ८१८ पुरूष, ९ लाख १६ हजार ४७० महिला तर ६४ तृतीय पंथी मतदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात १ हजार ९०६ मतदान केंद्र आहे. यात १७ लाख ७३ हजार १०७ मतदार असुन यात १४ लाख ७८५ पुरूष तर १२ लाख ६ हजार १८९ महिला मतदार आहे. जिल्ह्यातील ३६२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या १५ हजार २८७ मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे ७ हजार ६१९ मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील २ हजार १११ ठिकाणी ३ हजार ६१७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २६ हजार १३६ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.