जळगाव प्रतिनिधी | वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
महामार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून ७९ हजार रुपये किमतीचे डिझेल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. रईस हाशिम शेख (वय ३६, रा. गौरीपाडा, भिवंडी), रुबाबअली जलील अहमद (वय ३३, रा. मोहुआ बुजुर्ग, जि. उत्तर प्रदेश) व चालक अनिल सुभाष सरोदे (वय ३२, रा. आदिवासीपाडा, अंजूर फाटा भिवंडी, ठाणे) असे आरोपींची नावे आहेत.
मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यान महामार्गालगत असलेले हॉटेल्स, ढाब्यांसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल करणारी टोळी फिरत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या वाहनाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चोरीचे डिझेल असल्यास जप्त करून पुढील कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिलेले होते. या पथकाला वरणगावजवळील खुशाल ढाब्याजवळ वाहनाजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. पथकाने वाहनात बसलेल्या व आजूबाजूला फिरत असलेल्यांना ताब्यात घेतले. त्यांनी वरणगाव पोलिस ठाण्यातील दोन, भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून ३९ हजार १० रुपये किमतीचे ४१५ लिटर डिझेल, ४० हजार रुपये किमतीचे डिझेल, चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व मालवाहू वाहन जप्त केले आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, अशोक महाजन, युनूस शेख, सुनील दामोदरे, दीपक पाटील, महेश महाजन, किरण धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.