जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल एक महिला शुक्रवारी स्नानगृहात पाय घसरून जखमी झाली होती. आज सकाळी त्या महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला असून सदर महिला फैजपूर येथील रहिवाशी होती.
याबाबत माहिती अशी की. खालीदाबी रहमान खान (वय 30,रा इस्लामपुरा फैजपूर ता. यावल) यांना प्रसूतीसाठी 9 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यानंतर शुक्रवार दिनांक 17 रोजी बाथरूममध्ये पाय घसरल्यामुळे खालीदाबी गंभीररित्या जखमी झाली. अतिरक्तस्त्राव व टाके तुटल्यामुळे झालेल्या जंतूसंसर्गामुळे आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अगोदर दोन मुले असताना तिसरा अपत्यासाठी खालीदाबी यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेली होते. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला होता.