जळगाव प्रतिनिधी | कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे व कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे. या पालनाबाबत जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरप वर्तनाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दीत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बधांचे जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, नागरिकांनी पालन केल्यामुळे व कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त व ‘कवच कुंडल’ आणि ‘हर घर दस्तक’ या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झालेले आहे.
मात्र, कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचे जळगाव जिल्ह्यात 67 टक्के नागरिकांचा पहिला डोस व 24 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लसीकरणाचे प्रमाण हे राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने कमी आहे. सद्य:स्थितीत दक्षिण आफ्रिका, बोस्टाना, केनिया व इतर आफ्रिकन देशांमध्ये या नवीन व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन संभाव्य धोका टाळता येईल, असे राज्य शासनाच्या टास्क फोर्स व तज्ञांचे मत आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे व कोविड अनुरुप वर्तनाच्या पालनाबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग, आपत्ती व्य्वस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे व कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्याबाबत जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. आस्थापना, घटक, सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. त्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कर्तव्यकसूर संस्था आणि आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १ डिसेंबर रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.