चाळीसगाव (प्रतिनिधी) ही निवडणूक आणि तूमचे एक मत केवळ एका जिल्ह्याचे, उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची, हे ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळेच विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच भाजपचा जळगावचा उमेदवार हा हफ्तेखोर आहे, अवैध धंदे त्याच्या नावावर आहेत. अशा हफ्तेखोरांच्या हाती जळगावची सत्ता देणार का ? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.
महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.मुंडे पुढे म्हणाले की, मी प्रचाराच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र फिरत आहे. देशात सध्या महाआघाडीचे वादळ आहे. या वादळात कमळाच्या पाकळ्या अशा उडून जातील की अमित शाह आणि मोदी बसले तरी त्यांना पाकळ्या मोजता येणार नाहीत. सरकारच्या धोरणांवर टीका करताना ते म्हणाले की, नोटाबंदीचे काय झाले ? जीएसटीचे काय झाले ? मेक इन इंडिया, मुद्रा लोनचे काय झाले ? पाच वर्षात यांनी जी कामे केली त्याचा कवडीचाही फायदा जनतेला झाले नाही.
देवकर अप्पांना मतदान करण्याचे आवाहन करताना मुंडे म्हणाले की देवकर अप्पांना निवडून दिले तर तुमचं एक मत लोकशाही टिकवले, त्यांच्याविरोधात मत दिले तर तुम्ही देशाला अप्रत्यक्षपणे हुकूमशाहीकडे लोटणार आहात. त्यामुळे आपले बहुमुल्य मत देवकर अप्पांना द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, उमेदवार गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, मनीष जैन, रंगनाथ काळे आदी उपस्थित होते.