पाचोरा प्रतिनिधी | राज्यभरात गेल्या १४ दिवसांपासून एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विलीनीकरण करून घेण्यासाठी संप पुकारला असून संप काळात पगार नसल्याने हवालदिल झालेल्या नगरदेवळा येथील ४६ वर्षीय चालक दिलीप तुकाराम महाजन सोमवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्यावर नगरदेवळा गावी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाचोरा आगरात संपाचा पहिला बळी ठरला आहे.
नगरदेवळा ता. पाचोरा येथील दिलीप तुकाराम महाजन हे गेल्या ९ वर्षांपासून चालक म्हणून सेवेत होते. गेल्या १४ दिवसांपासून संप सुरू असल्याने व संप काळात पगार मिळत नसल्याने महाजन यांची परिस्थिती अतिशय हालाकीची असल्याने संप काळात त्यांची वृद्ध आई व पत्नी मोलमजुरी करून संसाराचा रहाटगाडा ओढत होते. चालक दिलीप महाजन हे रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाचोरा आगारात संपात सामील झालेले होते. त्यांची अचानक छाती दुखू लागल्याने ते नगरदेवळा गावी जाऊन आजारासाठी पैसे नसल्याने पत्नीस सोबत घेऊन त्यांचे नागद ता. कन्नड येथे सासुरवाडी येथे गेले होते. तेथून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास गेले असता त्यांना धुळे येथील रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.
धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांचे पश्चात वृद्ध आई, २ भाऊ, २ बहिणी, पत्नी, २ मुले , २ मुली असा परिवार असून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.