अमळनेर प्रतिनिधी | तरूणीची बदनामी करण्याची धमकी देत तब्बल २० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणार्या तिघांच्या विरोधात तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सतीश उर्फ सागर लक्ष्मण कोळी याने तालुक्यातील एका मुलीस फुस लाऊन तिच्यासोबत लग्न लावले. यानंतर संबंधीत विवाहाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मुलीच्या मामाकडून २० लाख रूपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास त्या मुलीची बदनामी करण्यात येईल अशी धमकी त्याने वारंवार दिली. त्याला अलका शेळके-मोरे पाटील (रा. नाशिक) आणि शरद उखा पाटील या दोघांनी सहकार्य केले.
यामुळे अखेर मुलीच्या मामाने मारवड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानुसार या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अलका शेळके-मोरे पाटील ही नाशिक येथील वकील आहे हे विशेष !