जळगाव, प्रतिनिधी | वरणगाव येथे नगरपरिषदेला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेच्या अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून तब्बल ५० लाख रूपये मूल्य असणारे अद्ययावत अग्नीशामक वाहन आज दाखल झाले आहेत. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते.
वरणगाव येथे नगरपरिषद अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झालीत परंतु अद्यापही अद्ययावत अग्नीशामन बंब नव्हता. मात्र हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मागील वर्षाच्या (२०१९-२०२०) अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून ५० लाख रूपये निधीतून अग्नीशमन वाहन खरेदी करण्यात आले. याचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून फायर फायटर वाहन नसल्याने नागरिकांकडून याची सातत्याने मागणी केली जात होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून याचा वरणगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागांना लाभ होणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डी.एच. पाटील, उपविभागीय अधिकारी तथा वरणगाव नगरपरिषदेचे प्रशासक रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी समीर शेख, अग्नीशमन पथकाचे प्रमुख दौलत गुट्टे, शाखा अभियंता गणेश ताठे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले. त्यांनी नगरपरिषदेसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सहकार्याने अग्नीशामन दलास वाहन मिळत असल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत गुट्टे यांनी केले. तर आभार गणेश ताठे यांनी मानले.
आठ नगरपालिकांना मिळणार वाहने
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना निधीतून अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून आठ नगरपालिकांना अग्नीशामक वाहने मिळणार आहेत. यात जामनेर, चोपडा, पारोळा, पाचोरा, अमळनेर, भडगाव, शेंदुर्णी, धरणगाव या नगरपालिकांचा समावेश आहे. यासाठी २ कोटी ३० लाख ३४ हजार इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पुढील महिन्यात या वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.