भडगाव प्रतिनिधी । शहरातील २४ वर्षीय तरूणाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सद्दाम अली फतरू अली (वय-२४) रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहतात. बांधकामावरील सेटींगचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सद्दाम अली हा नवीन पारोळा रोडवर असलेल्या ताडीच्या दुकानावर गेला. त्याठिकाणी असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान सद्दाम हा बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती सद्दामचा भाऊ मोहब्बत अली याला मिळाली. त्यांनी तातडीने भावाला उचलून पाचोरा येथील खसगी रूग्णालयात दाखल केले परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
मयत सद्दामला मारहाण का केली होती याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मयत झालेल्या सद्दाम अलीच्या नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन करत संशयितांना अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. दरम्यान, पोलीसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मयत सद्दामच्या पश्चात वडील फतरू अली रमजान अली, आई परवीनबी, भाऊ मोहब्बत अली, पत्नी यास्मीन, दोन मुली शुमेरा, जोया आणि ६ महिन्याचा इम्रान मुलगा असा परिवार आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.