जळगाव, प्रतिनिधी | आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सेवामार्गामधील तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणभिंतीचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर तापी पाटबंधारे महामंडळाचे विश्रामगृह असून सदर विश्रामगृहाचे दक्षिणेकडील भागाचे ६० मिटर रुंद राष्ट्रीय महामार्गाची हद्द आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीमधेच दोन्ही बाजूस ९ मिटर रुंद सेवामार्ग (व्हिस रोड) आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरेकडील प्रस्तावीत ९ मिटर सेवामार्गामध्ये तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणभिंतीचे अतिक्रमण करणेत आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भविष्यात जळगाव महानगरपालीकेकडून अथवा राष्ट्रीय महामार्गाकडून सेवामार्ग विकसीत करावयाचे झाल्यास तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणर्मितीचे अतिक्रमणामूळे सेवामार्ग विकसीतच होऊ शकत नाही. या सेवामार्गाचा अंतर्भाव हा जळगाव शहराचे मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविला आहे. या योजनेची अमलबजावणी करण्याची जबाबदारी सुध्दा महानगरपालीकेची आहे. तसेच ह्यामध्ये रस्त्यामधील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही महानगरपालीकेचीच आहे. साधारणत: १०-१२ वर्षापूर्वीचे सदर कुंपणभिंतीचे बांधकाम करुन जागा अतिक्रमीत झाली आहे. महानगर पालीका हद्दीमध्ये कोणत्याही शासकीय विभागास विकासकामे करावयाची झाल्यास त्यांना कोणतीही पुर्व परवानगीची गरज नाही. मात्र, विकास कामे हाती घेण्यापूर्वी स्थानिय प्राधिकरणास कोणतीही सुचना देणेत आलेली नाही. नियमानुसार शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी कोणतीही नोटीस अथवा पुर्वसूचना देणेची आवश्यकता नाही अशी स्पष्ट तरतुद आहे. तरी त्याप्रमाणे तातडीने कार्यवाही करणेत यावी. सदर अतिक्रमणस्थीत असेलेल्या ठिकाणी मुख्य चौफूलीवर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाअंतर्गत मोठ्या सर्कल (चौफूली) चे नियोजन आहे. त्यामूळे कुंपणभिंतीचे अतिक्रमण न काढल्यास सर्कलची आखणी मध्यभागी न होता ती स्थलांतरित होईल ह्यामुळे तरी वरील नमुद कुंपणभिंतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात येऊन सेवा रस्ता मोकळा करणेत यावा अशी विनंती करण्यात आली आहे.