ग्रामरोजगारांना ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी सेवेत घ्या; यावल तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी सेवेत घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवा संघाच्या वतीने यावल तहसीलदार आर. के. पवार यांना आज शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांची २८ हजार १४४ एवढी संख्या आहे. शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती केले आहे. त्यानुसार राज्यात २००६ पासून आतापर्यंत २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चात यांच्या निधीतून ६ टक्के मानधनावर काम करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनेलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते. पण राज्यात बरेच ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवकांवर खोट्या प्रोसिडिंगद्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून ग्रामरोजगार सेवकांना मानसिक मानसिक त्रास होऊन अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत म्हणजे कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे, ही मागणी मान्य न झाल्यास राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

 

या निवेदनावर खुशाल पाटील, बाळू तायडे, दिपक कोळी, ईश्वर अडकमोल, अनिल ढाके, लुकमान तडवी, कैलास सोळंकी, राजेंद्र पाटील, ईश्वर सपकाळे, मेहमूद तडवी, सर्फराज तडवी, घनश्याम पाटील, मेहरबान तडवी, विजय सपकाळे, अल्लाउद्दीन तडवी, अनिल अडकमोल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content