जळगाव प्रतिनिधी । वाघूर व अंजनी धरणावर यापुर्वी काम करणाऱ्या सुरक्षारक्षक यांची नावानिशी शिफारस मिळावी व थकीत वेतन मिळण्याबाबत महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मंगळवार 21 सप्टेंबर रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघुर व अंजनी धरणावर पूर्वी काम केलेले सुरक्षारक्षक यांची नावांची शिफारस मिळावी, याबाबत महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून लेखी निवेदने व धरणे आंदोलन करून संबंधित विभागास जाणीव करून देण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच अंजनी धरण येथील सुरक्षारक्षकांचा जानेवारी-२०२१ ते जुलै २०२१ चे वेतन संबंधित विभागाने दिलेले नाही. अशा विविध मागण्यांसाठी संघटना आणि सुरक्षारक्षक यांनी आज मंगळवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये पाटबंधारे विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर करावे, थकीत पगार करावा आणि अंजनी व वाघुर धरण येथील सुरक्षारक्षक यांची नावानिशी शिफारस करावी अशी मागणी केली आहे.
आंदोलनस्थळी संघटनेचे अध्यक्ष सोमा कढरे, सरचिटणीस गौतम पारवे, जिल्हाध्यक्ष फकीरा चव्हाण, पूनमचंद निकम, सुरसिंग पाटील, हरी पाटील, शुभम पाटील, अजय पाटील, दत्तू पाटील, शरद पाटील यांच्यासह आदी सुरक्षारक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.