भुसावळ प्रतिनिधी | शहरातील कुख्यात गुंड आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या याने ”तुमच्या मुलीचा विवाह माझ्याशी करा अन्यथा सर्वांना गोळ्या घालेल” अशी धमकी एका कुटुंबाला दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या (रा.अयान कॉलनी, भुसावळ) हा हिस्ट्रीशीटर गुन्हेगार असून त्याच्यावर लुट, धमकावणे आदींसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने रविवारी रात्री खडका रोडवरील पटेल कॉलनीत रहिवास असणार्या एका कुटुंबाला धमकावले.
संबंधित कुटुंबातील १९ वर्षीय तरुणीचा आपल्यासोबत विवाह करावा. अन्यथा कुटुंबातील सर्वांना गोळी घालू, अशी धमकी दे त्याने कुटुंबाला भयग्रस्त केले. यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिसांना कॉल केला. मात्र पोलिसांची चाहूल लागतात बाबा काल्या याने आपल्या साथीदारासह धूम ठोकली.
या कुटुंबातील १९ वर्षीय युवतीचा २ एप्रिल २०२० रोजी विवाह निश्चित झाला होता. मात्र, जळगाव येथील वर मुलास संशयित बाबा काल्याने युवतीशी विवाह केल्यास ठार मारेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे हा विवाह तुटला. यानंतर या तरूणीचा आपल्यासोबत विवाह करावा यासाठी त्याने धमकावले. हा विवाह न केल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांना गोळ्या मारेल, अशी धमकी देत पिस्तुलाच्या धाकावर घरावर दगडफेक केल्याने हे कुटुंब भयग्रस्त झाले असून त्यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यानुसार आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या (रा.अयान कॉलनी, भुसावळ) आणि २० वर्षीय अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मंगेश गोंटला तपास करत आहेत.