भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलाचे वजन कमी करून त्यातील एल टाईप वळण काढून पुल सरळ करण्याच्या कामकाजाला रेल्वे प्रशासनातर्फे आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
पुल दुरुस्तीच्या कामकाजामुळे हा पुल पाच महिने बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांना रेल्वे फलाटावर उतरण्यासाठी नवीन पूलाचा वापर करावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे पुलांची दुर्घटना रोखण्यासाठी जुन्या पुलांचे नूतनीकरणाचे काम केले जात आहे. ब्रिटिश कालीन पुलाचे वजन कमी करून जुन्या पुलाचे नूतनीकरण केले जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल हा 1927 मध्ये बनविण्यात आला होता. या पुलाचे वजन बाराशे टन असून यावरील सिमेंटचा थर काढून सातशे टनावर वजन आणले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. फुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे बोर्डाकडून तीन कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुलाची दुरुस्ती आणि नवीन प्लॅटफॉर्म वर उतरण्यासाठी पायऱ्यांचे जिने तयार केले जाणार आहे जुन्या पादचारी पुलाची लांबी 162 मीटर रुंदी 2.30 मीटर , तर उंची सहा मीटर आहे. पुलाचे नूतनीकरण केले जात असल्यामुळे हा पुल प्रवाशांसाठी पाच महिने बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर उतरण्यासाठी नवीन पुलाचा वापर करावा लागणार आहे.