भुसावळ प्रतिनिधी | गाडीच्या डिक्कीत ८० हजार ठेवून कामानिमित्त बँकेमध्ये गेलेल्या इसमाच्या डिक्कीतून ही रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरात घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी शांताराम विठ्ठल मानकरे, त्यांची पत्नी कुमुदिनी मानकरे हे शुक्रवारी दुपारी जेडीसीसी बँकेत गेले होते. त्यांनी बँक खात्यातून ८० हजारांची रक्कम काढली. ही रक्कम आणि कागदपत्रे एका बॅगेत ठेवली. ही बॅग दुचाकीच्या (क्रमांक एमएच.१९-सीएच.९४४८) डिकीत ठेवली. यानंतर मानकरे दाम्पत्य दुसर्या बँकेत कामानिमित्त गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून कागदपत्रे व ८० हजार रुपये असलेली बॅग लांबवली. हा प्रकार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या जवळच घडला.
मानकरे यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती देताच निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी घटनास्थळ गाठले. बँक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये चोरटे कैद झाल्याची शक्यता असून याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.