जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात मंदिरे बंद असून इतर राज्यात ती उघडी आहे. महाराष्ट्र राज्यातच मंदिरे बंद का असा प्रश्न हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्य सरकार राजसत्तेचा गैरवापर करत आहे. याद्वारे राज्य सरकार जनतेवर मोठा अन्याय करत असल्याचे मत हिंदू श्री. देसाई यांनी व्यक्त केले. सर्वसमावेशक हिंदू राष्ट्राची घोषणा व्हावी, समान नागरी कायदा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यालय उद्घाटनासह विविध कार्यक्रमासाठी धनंजय देसाई हे दोन दिवसांपासून जळगाव शहरात आले आहेत. यावेळी हिंदू राष्ट्रसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, निरज जसवानी हे उपस्थित होते. पुढे बोलतांना धनंजय देसाई म्हणाले की, देशभरातून, जगभरातून मोठ्या संख्येन ज्याठिकाणी नागरिक जातात अशी उज्जैन, काशिविश्वनाथ ही तिर्थक्षेत्र उघडली जातात. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील सर्व तिर्थक्षेत्र उघडी आहेत, आज सर्व राजकीय मेळावे होताहेत, हजारोंच्या संख्येने एकत्र येवून राजकारण्यांचे वाढदिवस साजरे केले जाताहेत आणि हिंदूची मंदिरे बंद ठेवून असा कुठल्या पध्दतीने कोरोनावर नियंत्रण मिळवल जातेय, हिंदूची देवळे बंद केल्यावर असा कुठला कोरोना थांबणार आहे, शासनाच्या या अजब कारभाराबाबत देसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले.एकीकडे परमीट रुम बीयर बार उघडली जाताहेत आणि दुसरीकडे तिथे आचार संहिता पाळली जातेय, एकमेकांमध्ये अंतर ठेवले जावून स्पर्श टाळला जातो, अशी तिर्थक्षेत्र बंद ठेवली जाताहेत, हा सरकारचा बुध्दीवाद नाही तर भ्रष्टवाद असल्याचेही देसाई म्हणाले. त्यामुळे आगामी काळात मंदिरे उघडण्यासाठी हिंदू राष्ट्रसेनेच्या माध्यमातून आंदोलने उभारली जाणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/142497054656064