जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीच्या बाजुला असलेल्या शेतातून ३० हजार रूपये किंमतीचे पीव्हिसी पाईप चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
प्रशांत पंडितराव साबळे रा.सुप्रीम कॉलनी व देविदास प्रकाश घुले रा. रामेश्वर कॉलनी अश्या अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय-७६) रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या बाजुला त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या शेतातुन २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतकर्याचे नुकसान झाल्याने या गुन्ह्याची पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांनी गंभीर दखल घेवून संशयितांना अटक करण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पाईप लांबविणारे संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, मुकेश पाटील, सतीश गर्जे यांच्या पथकाने प्रशांत साबळे व देविदास घुले या दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. संशयित प्रशांत साबळे याच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत