मराठा आरक्षणासाठी संसदेतही लढण्याची भूमिका मांडली – संभाजीराजे

 

नांदेड :   वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला नांदेडमधून पुन्हा सुरुवात झाली यावेळी खासदार संभाजीराजे  यांनी आक्रमक भूमिका मांडली. आपण संसदेत त्यासाठी लढण्याची भूमिका मांडली, असं सांगत मराठा आरक्षणासाठीचे पर्यायही सुचवले.

 

यावेळी संभाजीराजेंनी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दाखले देत स्वराज्याचा अर्थ समजावून सांगितला. स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो , असेही ते म्हणाले .

 

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.”

 

मराठा आरक्षण मिळवण्यासाठीचे पर्यायही त्यांनी यावेळी मांडले. एक वेगळा प्रवर्ग निर्माण करुन त्याला सामाजिक, आर्थिक मागास सिद्ध करा. कारण तुम्ही मागास ठरल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे राज्याने ही जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्याने पुनर्विचार याचिकेचा पाठपुरावा केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

यावेळी राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचं खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितलं आहे. समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती इथे बसला आहे. मला एक पत्र आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १५ पानी पत्र पाठवलंय. त्यात समाजासाठी काय काय करतोय, हे लिहिलंय. त्यांनी आंदोलनाची दखल घेतली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण या १५ पानी पत्रामध्ये अनेक तफावती आहेत”, असं संभाजीराजे म्हणाले.

 

“मला हे पत्र पटत नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. सरकारने सांगितलं की ज्यांना २०१४पासून कोविडच्या संकटापर्यंत ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत, त्यांना रुजू करून घ्या. समाजाचे लोक खूश झाले. लोक अधिकाऱ्यांकडे गेले, की म्हणतात, तुमचं आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला नोकरी कशी द्यायची. मग हा जीआर काढून काय फायदा? सरकार या बाबतीत झोपलंय का? त्या जीआरचा काय फायदा?” असा सवाल संभाजीराजे भोसले यांनी केला.

 

“ज्यांची निवड झाली, पण त्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या मुलांवर अन्याय चालणार नाही. या पत्रात तुम्ही यावर काही लिहिलंय का? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे?” असं देखील संभाजीराजे  म्हणाले.

 

“१४-१५ ऑगस्टला २३ वसतिगृहांचं उद्घाटन करणार असं अशोक चव्हाण म्हणाले. १५ ऑगस्टला एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या प्रयत्नातून वसतिगृह सुरू करून त्याचं उद्घाटन केलं. या २३ पैकी मागच्या सरकारने बरेच केले आहेत. नाशिक, कोल्हापूर, बीड, पुणे हे वसतिगृह मागच्या सरकारनेच केले आहेत. मग तुम्ही काय केलं? तुम्ही काही केलं नाही, म्हणून तुम्ही इथे आले नाहीत, असं आम्ही समजायचं का?” अशा शब्दांत संभाजीराज भोसले यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

 

Protected Content