मुंबई : वृत्तसंस्था । युवासेनेचे सर्व मेळावे रद्द करण्यात आले आहेत आता फक्त युवासेनेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांसोबत बैठक होईल. वरील माहिती युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी दिली
शिवेसनेचा विस्तार तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन युवासेनेतर्फे राज्यभर पदाधिकारी संवाद दौरे केले जात आहे. सध्या कोरोनाचे सावट असूनदेखील या कार्यक्रमांत मोठी गर्दी होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमांत गर्दी होऊ नये म्हणून युवासेनेचे मेळाव रद्द करण्यास सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांचे निर्देश तसेच सध्याची कोरोनास्थिती याबाबत सरदेसाई यांनी माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील सर्व मेळावे रद्द करण्यात येत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील युवासेनेचे सर्व मेळावे रद्द करण्यात आले असून फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे,” असे सरदेसाई म्हणाले.
युवासेनेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत युवा मेळावे घेतले जात आहे. मेळावे आणि संवादाच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याचा शिवसेना तसेच युवासेनेकडून प्रयत्न केला जात आहे. 13 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत सरदेसाई यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. तशीच परिस्थीती नाशिकमध्ये 7 ऑगस्ट रोजी निर्माण झाली. याबाबत विचारले असता शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली, असं उत्तर देत वेळ मारून नेली होती.
आता युवासेनेच्या संवाद मेळाव्यात होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे होत असलेले उल्लंघन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील सर्व युवासेनेचे मेळावे रद्द करण्यात आले आहेत. येथे फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.