आदर्श शिक्षकाची गुणग्राहकता वैमानिक कल्याणीचा केला सत्कार

पारोळा, प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मोंढाळे-पिंप्री येथील मूळ रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्य असलेले कैलास चैत्राम पाटील व सौ मोहिनी पाटील यांची सुकन्या कल्याणी पाटील हिने अमेरिकत वैमानिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याने आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी तिचा सत्कार केला.

 

राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना नेहमीच गुणी व्यक्तिबद्दल आदर, आनंद व अभिमान वाटत असतो. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मोंढाळे-पिंप्री येथील मूळ रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्य असलेले कैलास चैत्राम पाटील व मोहिनी पाटील यांची सुकन्या कल्याणी पाटील हिने आपल्या नवव्या वर्षीचं वैमानिक होण्याचं स्वप्न मोठ्या जिद्दीने व अपार मेहनतीने अमेरिकेत वैमानिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अमेरिकन एअरलाईन्समध्ये सेवेची संधी देखील मिळवली.  ती दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी ती सेवेत दाखल होणार आहे. तालुक्यातील रहिवासी व आपले माजी विद्यार्थी देवीदास चैत्राम पाटील यांची पुतणी म्हणून विशेष आनंद व अभिमान वाटल्याने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक स.ध. भावसार यांनी कल्याणी पाटील हिच्या काकांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, अभिनंदन पत्र व पाचशे रुपये रोख बक्षीस देऊन भावपूर्ण सत्कार केला. यावेळी त्यांनी पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या. कल्याणी पाटील व भावसार सरांचे शहरात व तालुक्यात अभिनंदन होत आहे.

 

 

Protected Content