यावल प्रतिनिधी । श्रावण सोमवार निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या तरूणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील हंबर्डीजवळ घडली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, वासू उमेश गैची (वय-१७), जयेश राजू सुरवाडे (वय-१९) आणि हर्षल शिवप्रताप घारू (वय-१६) तिघे रा. यावल जि.जळगाव हे श्रावण सोमवार निमित्त मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाले. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास (एमएच १९ बीवाय ४२१३) क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या झालेल्या भिषण अपघातात वासू उमेश गैची या तरूणाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला तर जयेश सुरवाडे आणि हर्षल घारू हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मयत वासू गैची हा तरूण यावल येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील उमेश गुलाब गैची हे चिखली नगरपालिकेत कर्मचारी आहे. त्याच्या पश्चात आई भावना, कल्याणी आणि कत्तायणी या दोन बहिणी, लहान भाऊ प्रथमेश असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.