खुल्या भुखंडावरील अतिक्रमण विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पुनर्वसीत गावठाण खादगाव येथील खुल्या भुखंडावरील अतिक्रमण काढण्याबाबत आदेशित केलेले असतांना देखील अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश भोईटे यांनी गुरुवार २२ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

 

जामनेर तालुक्यातील पुनर्वसीत गावठाण खादगाव येथील खुल्या भुखंडावर अतिक्रमण होत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश भोईटे यांनी ग्रामसेवक,तहसिलदार जामनेर,जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निदर्शनास आणुन संबंधिंताकडे रितसर अर्ज करून सदर अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन स्वरूपात सादर केले होते. त्यांच्या या निवेदनास जिल्हाधिकारी जळगाव (पुनर्वसन) यांचेकडून दि. २३/९/२०२० रोजी जामनेर तहसिलदार यांना प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे कळविले होते.  त्यानुसार तहसिलदार यांच्या मार्फत सर्कल कोळी यांच्या कडून दि. ७.१०.२०२० रोजी प्रत्यक्ष स्थळी जागेची पाहणी करून अतिक्रमण झाल्याचे नमुद करण्यात येवुन सदर अतिक्रमणधारकाकडून लेखी स्वरूपात जाबजबाब लिहुन घेण्यात आला की, सदरील अतिक्रमण केलेले तार कंपाऊंड व टाकलेल्या काट्या व इतर असे काढुन घेईल व जागा मोकळी करून देईल.  मात्र, आजतागायत सदरील अतिक्रमणधारकाकडून कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे सदर खुल्या भूखंडावरील अतिक्रमणधारकाने संबधीत विभागाच्या आदेशाला न जुमानता  केराची टोपली दाखवली असुन सदरील अतिक्रमीत जागा तात्काळ शासनाने मोकळी करून गावकऱ्यांसाठी खुली करावी. या मागणीसाठी खादगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भोईटे यांनी जामनेर तहसिल कार्यालयासमोर  दि.२२ जुलै २०२१, गुरूवार रोजी आमरण उपोषणाचा इशारा तहसिलदार जामनेर यांना लेखी स्वरूपात दिला आहे.

 

Protected Content