विहिंप अध्यक्षपदी रवींद्र नारायण सिंह

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । व्यवसायाने अस्थिव्यंग शल्यचिकित्सक असलेले पद्माश्री पुरस्काराचे मानकरी रवींद्र नारायण सिंह यांची   विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

 

मूळचे बिहारचे असलेले सिंह हे आतापर्यंत विहिंपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. वैद्यकशास्त्रातील योगदानाबद्दल २०१० साली त्यांना ‘पद्माश्री’ हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता.

 

‘आमच्या विश्वस्त मंडळाने पद्माश्री रवींद्र नारायण सिंह यांची  अध्यक्ष म्हणून निवड केली आहे’, असे विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एप्रिल २०१८ पासून विहिंपचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे विष्णू सदाशिव कोकजे यांची ते जागा घेतील.

 

‘कोकजे  ८२ वर्षांचे आहेत. संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून ते मुक्त होऊ इच्छित होते. त्यांच्या इच्छेनुसार आणि आमच्या घटनेनुसार निवडणूक घेण्यात आली’, असे जैन यांनी सांगितले. सिंह हे प्रख्यात अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (ऑर्थोपेडिक सर्जन) आहेत. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय यांच्यासह इतर क्षेत्रांतील योगदानाबद्दल ते ओळखले जातात. अशा व्यक्तीची विहिंपच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे जैन म्हणाले.

 

याचवेळी सरचिटणीस पदासाठीही निवडणूक होऊन सध्याचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

 

Protected Content