पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा गावाच्या ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे .
लोहारा येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी निवारण व्हावी म्हणून ग्रामपंचायतीने वाघूर धरणावरून पाणीपुरवठा व्हावा असा प्रस्ताव सादर केलेला होता. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे सरकारमध्ये ना. गुलाबराव पाटील राज्याचे पाणीपुरवठामंत्री व पालकमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायतने सतत पाठपुरावा केला. जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रक सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी दिले आहे.
योजनेच्या कामाची रक्कम ११ कोटी ३८ लाख रुपये किंमतीची ई- निविदा १२ जुलैरोजी प्रसिद्ध झालेली आहे ती ६ ऑगस्टरोजी उघडण्यात येईल त्यामुळे लोहारावासीयांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. काम लवकर सुरु व्हावे यासाठी आमदार किशोर पाटील, माजी जि. प. सदस्य संजय गरुड, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, शेतकरी संघटनेचे अरुण पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा केला आहे.
या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. चौधरी, उपविभागीय अधिकारी पी. व्ही. मनुरे, शाखा अभियंता डी. आर. कराड या सर्वांनी योजना तंत्रिकदृष्टया पूर्ण करून काम सुरू होण्यासाठी निविदा प्रसिध्द केली त्यांचे आभार सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी मानले आहेत .