यावल प्रतिनिधी । शहरातील मुख्य बाजारपेठेतील कवडीवाले यांच्या सराफा दुकानात ७ जुलै रोजी बंदुकीचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १२ लाखांचा मुद्देमाल जबरी लुटून नेला होता. यातील पहिल्या संशयित आरोपीस काल अटक केली होती. तर आज दुसरा संशयित आरोपीला भुसावळातून अटक केली आहे.
चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) रा. मोहित नगर भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दिनांक ७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
या गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती त्यानुसार त्याला कांदीवली मुंबईतून अटक केलीं होती. त्याने दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला ता. यावल ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले होते. यातील संशयित आरोपी चंद्रकांत चाले हा भुसावळात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर आज त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरिफाद्दिन काझी, किशोर राठोड, पोलीस नाईक युनुस शेख, पो.कॉ. विनोद पाटील, रणजीत जाधव यांनी ही कारवाई करत भुसावळातून अटक केली. पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरोडा प्रकरणातील काल अटक केलेल्या संशयित आरोपी निवृतती गायकवाड याला आज यावल न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एस.बनचरे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीस पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकील अॅड नितिन खरे यांनी युक्तीवाद केला.