मंत्रिमंडळ विस्ताराआधी तीन मंत्र्यांना डच्चू; एका राज्यमंत्र्यांना मागितला राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.   महिला व बाल विकास राज्यमंत्र्यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे.

 

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली असून, शपथविधी सोहळ्याआधी मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चूही देण्यात येत आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येईल, अशी चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरू होती. त्याची सुरूवात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांपासून झाली. केंद्र सरकारने ८ राज्याचे राज्यपाल बदलत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता केंद्रीय शिक्षणमंत्री हे मोदींच्या मंत्रिमंडळात नसतील. रमेश पोखरियाल निशंक यांनीही मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. कोरोनानंतर होत असलेल्या त्रासाचं कारण त्यांनी दिलं आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे.

 

यातच आता महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांचीही विकेट पडणार असल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे. देबश्री चौधरी यांना पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातू डच्चू दिला जाण्याची शक्यता असलेल्या आणखी काही नावांचीही चर्चा सुरू आहे.

 

Protected Content