जळगाव प्रतिनिधी | आजवर जाहीरपणे भाजपला व ईडीला आव्हान देणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करून ईडीने पहिले पाऊल टाकले आहे. यामुळे आता खडसे आता कसा काऊंटर अटॅक करणार ? ते आक्रमक होणार की बचावात्मक पवित्र्यात राहणार ? आता सीडी बाहेर येणार का ? या प्रश्नांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता भोसरी भूखंड प्रकरणी त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे आता खडसे यांच्या भोवती ईडीचा फास आवळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्वरूपाची कठोर कारवाई होण्याचे संकेत खडसे यांना मिळाले होते. यामुळे ते मध्यंतरी बरेच दिवस मुंबईत होते. तर आता देखील गेल्या तीन दिवसांपासून ते मुंबईतच ठाण मांडून आहेत.
एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल हा मात्र अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे यांनी सातत्याने भाजप नेत्यांवर व विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ असे आव्हानही दिले होते. या पार्श्वभूमिवर मध्यंतरी खडसे यांची ईडीने चौकशी देखील केली होती. यानंतर काल रात्रभर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करतांना त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ असे वक्तव्य केले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात ईडी विरूध्द सीडी हे वाक्य खूप प्रचलीत झाले होते. मध्यंतरी खडसे यांची चौकशी झाल्यानंतर अनेकांनी त्यांना सीडीबाबत विचारणा केली होती. तथापि, मात्र त्यांनी यावर मौन पाळले होते. यामुळे आता ईडीने थेट त्यांच्या जावयाला अटक केल्यानंतर सीडी प्रकरणाचे काय ? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.