पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी ) आपल्यावरील अन्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जात असतांना कोर्ट फी स्टँम्पची गरज भासत असते. याबाबत कायदेशीर सल्ला घ्यावयाचा असल्यास लेखी कागदावर शासकीय मुद्रांक असलेल्या कोर्ट फी स्टँम्पची आवश्यकता असते. या स्टंम्पचे जामनेर न्यायालया समोर जादा दराने विक्री होत असल्याचे नागरिक तक्रार करीत आहेत.
न्यायालातील प्रकरणानुसार वकील १२, १५, २० तिकिटांची संख्या सांगत असतात. जामनेर येथे ही तिकिटे खरेदीसाठी न्यायालयासमोरील दुकानामध्ये गेल्यावर दुकानदार अव्वाचा सव्वा भाव लावून अशीलाची लुट करीत असल्याचा प्रकार घडत आहेत. शासकीय मुद्रांकावर जास्तीचे पैसे आकारणे बेकायदेशीर असतांना न्यायालय समोरील एका दुकानातच हा प्रकार घडत आहे. हा दुकानदार नियमांची पायमल्ली करत पीडितांची आर्थिक लुबाडणूक करत आहे. या दुकानदाराला कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करण्याची ताकीद देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत असुन नागरिकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यात यावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.