वीज तारांना स्पर्श झाल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कठोरा येथे घराच्या धाब्यावर खेळत असताना मुख्य वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आज तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश मुकेश वासकले (वय-१२ रा.टाकळी, ता.घुसगाव, जि.बडवाणी, मध्य प्रदेश) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.५ जुलै) रोजी घडली आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेशातील मुकेश प्रताप वासकले हे पत्नी व तीन मुलांसह सहा वर्षापासून रोजगारानिमित्ताने कठोरा येथे वास्तव्याला आहेत.  भीकन श्रीपत पाटील यांच्याकडे ते कामाला असून गावातच वास्तव्याला आहेत. काल रविवारी सायंकाळी त्यांचा मुलगा रितेश हा इतर मुलांसोबत खेळत असताना धाब्यावर चढला. तेव्हा धाब्यावरुन गेलेल्या वीज तारांना रितेशचा स्पर्श झाल्याने तो फेकला गेला. यात भाजला गेल्याने शेतमालक व कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार ईश्वर लोखंडे यांनी पंचनामा केला. आज सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content