मुंबई । सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर असणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. पटोले यांनी अलीकडे आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांची दिल्ली येथील भेट महत्वाची मानली जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कालच जळगाव जिल्हा दौर्यावर होते. तर ते आज धुळे जिल्ह्यात आहेत. मात्र हा दौरा अर्ध्यावर सोडून ते दिल्ली येथे जात आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.
नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्याने आधीच प्रदेश काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यांच्या या भूमिकेवर पक्षातील काही नेते आणि आमदार नाराज असल्याची माहिती आहे आहे. याबाबत काही नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. यामुळे आता या दौर्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.