भुसावळ प्रतिनिधी । शहरातल्या सर्वोदय छात्रायलातील बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले माजी आमदार संतोष चौधरी यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ सर्वोदय छात्रालयाच्या जागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेेठ पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली होती. या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला तपास करीत आहे.
संतोष चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील मुख्याधिकार्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देखील दिले होते. तर, पोलिसांनी संतोष चौधरी यांचा तपास सुरू केला असतांना ते मिळून आले नव्हते.
दरम्यान, संतोष चौधरी यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर शनिवारी कामकाज होऊन चौधरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना मंगळवारपर्यंत अटक करू नयेत असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तर त्यांच्या जामीनवर २२ रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर आज बाजारपेठ पोलीस स्थानकात संतोष चौधरी हजर झाले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण मुख्याधिकार्यांना ओळखत देखील नसल्याचे सांगितले.